येत्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र (Mahashivratri) असून या काळात विविध शिवमंदिरे आणि 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. वेरूळ येथे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर असून इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मात्र, या काळातील वाढती गर्दी लक्षात घेता महाशिवरात्रीला श्री घृष्णेश्वरांचे हात लावून व डोके टेकून दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना गाभाऱ्याच्या दरवाजातून दर्शन घ्यावे लागेल.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भाविकांना ओंकारेश्वरच्या धर्तीवर घृष्णेश्वराचा जलाभिषेक बाहेरून करता येईल, तसेच गर्दीचा विचार करता व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहापर्यंत दर्शन मिळणार असून, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. दर्शन रांगेतच बाहेर प्रसाद वाटप करता येईल, असे देवस्थानचे उपाध्यक्ष टोपरे यांनी सांगितले.




