पत्नी सुनीताच्या मुलाखतीनंतर गोविंदाची स्पष्ट प्रतिक्रिया; मौन म्हणजे कमजोरी नाही, असे ठाम मत
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहेत. घटस्फोटाच्या अफवांमुळे हे दाम्पत्य वारंवार चर्चेत आले असून, नुकतीच सुनीताने दिलेल्या एका मुलाखतीत २०२५ हे वर्ष तिच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण गेल्याची भावना व्यक्त केली होती. गोविंदाबद्दल ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तिने सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर आता गोविंदाने अखेर या विषयावर आपली बाजू मांडली आहे. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने या सर्व चर्चांवर स्पष्टपणे भाष्य करत, स्वतःविरोधात दीर्घकाळापासून कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गोविंदा म्हणाला की, “माझ्या आयुष्यातील स्त्रियांबद्दल मला नेहमीच आदर आहे—माझी आई, सासू किंवा पत्नी. मी कधीही कोणत्याही स्त्रीविरोधात उभा राहत नाही. माझ्या पत्नीने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि ती तिथे तिची मतं मांडते. त्यात काहीही चुकीचं नाही.” मात्र, एका मित्राने आपल्याला अनेक वर्षांपासून कट रचला जात असल्याचा इशारा दिल्याचेही त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, “काही गोष्टी एक-दोन वर्षं चालल्या तर योग म्हणता येतो, पण १४–१५ वर्षांनंतर ती गोष्ट प्रयोग बनते. जेव्हा अशा कटात कुटुंबाचा वापर केला जातो, तेव्हा माणूस हादरतो. पण हे सर्व गोविंदा नाही, म्हणून लोकांना थोडं वेगळं वाटत असावं.”
पत्नी सुनीताबद्दल बोलताना गोविंदाने तिचं कौतुकही केलं. “ती हुशार आहे, सुशिक्षित आहे आणि तिच्या बोलण्यात काहीही गैर नाही,” असे तो म्हणाला. मात्र, सतत मौन बाळगल्यामुळे लोक चुकीचे निष्कर्ष काढतात, ही खंतही त्याने व्यक्त केली. “मी बोलत नाही म्हणजे मी चुकीचा आहे, असा समज केला जातो. म्हणूनच आज मी बोलतोय,” असे त्याने स्पष्ट केले.
गोविंदाने असा दावाही केला की, एखाद्या व्यक्तीला आधी कुटुंबापासून आणि नंतर समाजापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो. “मी अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मला योग्य काम मिळालं नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी तक्रार करत बसलोय. मी अनेक चित्रपट स्वतःहून नाकारले आहेत,” असे त्याने सांगितले.
फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्धी आणि संपत्ती यामुळेच अनेकदा अनपेक्षित आरोप आणि बदनामी सहन करावी लागते, असे मतही गोविंदाने मांडले. “जेव्हा लोकप्रियता एका टप्प्यापेक्षा जास्त वाढते, तेव्हा लोक तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी काहीही करू शकतात,” असे तो म्हणाला.
पत्नीने त्याच्या वर्तनाबाबत इशारा दिल्याच्या प्रश्नावर गोविंदाने हसत प्रतिक्रिया दिली. “माझं लग्न किती वेळा झालं आहे? ४० वर्षांत मी एकदाच लग्न केलं आहे. चार-पाच लग्नं केलेली नाहीत,” असे सांगत त्याने आपल्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
एकूणच, गोविंदाने या मुलाखतीत घटस्फोटाच्या चर्चांपासून ते स्वतःविरोधातील कटाच्या आरोपांपर्यंत अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे.




