बीडमधील सभेत पडळकरांचा विशिष्ट समुदायावर निशाणा, औरंगजेब, मुघल नावांवरूनही वादग्रस्त वक्तव्य
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने वादाला तोंड फोडले आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील एका सभेत बोलताना त्यांनी हिंदू मुलींना जिममध्ये जाण्यापासून परावृत्त करत घरीच योगा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा दावा आहे की, काही जिम ट्रेनर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे “षड्यंत्र” रचत आहेत. “हिंदू मुलींनी अशा जिममध्ये जाऊ नये जिथे ट्रेनरची ओळख माहिती नाही. घरीच योगा करा, यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल,” असे पडळकर म्हणाले. पडळकर यांनी यावेळी विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत त्यांच्यावर हिंदू मुलींना आमिष दाखवल्याचा आरोप केला. तसेच, महाविद्यालयांमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी कठोर यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. “आपल्याला एक मजबूत प्रतिबंधक व्यवस्था तयार करावी लागेल,” असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, पडळकर यांनी औरंगजेब आणि मुघलांशी संबंधित गावांची नावे बदलण्याची मागणी केली. “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणारे हे सरकार आहे. औरंगजेब, जहांगीर मोहा यांसारखी नावे पुसली गेली पाहिजेत. अहिल्यानगरसारखी नावे कपाळावर आणि मुलांच्या दाखल्यांवरही लिहावी लागतील,” असे त्यांनी ठणकावले. बीडमधील जहांगीर मोहा गावाचे नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कारवाई करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.पडळकर यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “बारकी मुलं रडल्यासारखं आव आणता, पण तुम्ही कायद्याच्या देशात राहता. अहिल्यानगरच बोलावं लागेल,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले. या वक्तव्यांमुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.




