spot_img

Gondia News : गोंदियात लकी ड्रॉ प्रकरण भोवलं; सहाय्यक धर्मदाय आयुक्त निलंबित

spot_img

गोंदिया जिल्ह्यातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त (परिविक्षाधीन) दिशा पजई यांना लकी ड्रॉ योजनेत सहभागी होऊन चारचाकी वाहन जिंकल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. शासनाची पूर्वपरवानगी न घेता या योजनेत सहभाग घेतल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1971 मधील नियम 12, 13 आणि 19 चे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील एका नामांकित ज्वेलर्सने सोने खरेदीदारांसाठी ‘लकी ड्रॉ’ योजना राबवली होती. या योजनेत सहभागी झालेल्या पजई यांनी चारचाकी वाहन जिंकले. त्यानंतर गोंदियातील नव्या प्रतिष्ठानाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे वाहन स्वीकारले. या घटनेची दखल घेत राज्याचे प्रधान सचिव व विधि परामर्शी दिलीप शिवाजीराव घुमरे यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1979 अंतर्गत कारवाई करत त्यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गोंदिया येथेच राहील आणि पूर्वपरवानगीशिवाय ते मुख्यालय सोडू शकणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची तक्रार करणारे यशवंत मानकर यांनी लोकसेवकांनी संस्थांकडून बक्षिसे स्वीकारल्यास प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य परिस्थिती समोर येईल, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, या विषयावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता दिशा पजई यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शासनाच्या निधी व न्याय विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली असून, या निर्णयामुळे प्रशासनातील आचारसंहितेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ