कुंभमेळा तयारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, गिरीश महाजनांचा विरोधकांवर घणाघात
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरातील विकासकामांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तपोवनात झाडांची छाटणी केल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंनी महाजनांचा उल्लेख ‘लाकूडतोड्या’ असा केल्यानंतर, आता गिरीश महाजन यांनीही तितक्याच तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिकमधील सभेत बोलताना राज ठाकरेंनी महाजनांवर खोचक आणि उपरोधिक टीका केली होती. तपोवनातील झाडांवर कुर्हाड चालवण्याचा आरोप करत त्यांनी, “काही लोक झाडं छाटण्याआधी आपल्या पक्षातील माणसं छाटतात आणि नंतर बाहेरून झाडं आणून पक्षात लावतात,” असा टोला लगावला होता.
या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी रविवारी गोदाघाटावर झालेल्या भाजपच्या सभेत आपली भूमिका मांडली. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी तपोवनात आवश्यक व्यवस्था केली जात असून, गेल्या काही वर्षांत नैसर्गिकरित्या उगवलेल्या लहान झाडांवरून मुद्दाम वाद पेटवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाजन यांनी स्पष्ट केलं की, मोठ्या झाडांची तोड केली जाणार नाही, ही हमी सरकारने अनेकदा दिली आहे. आंध्र प्रदेशातून हजारो झाडे आणून लागवड करण्यात आली असून, पुढील वृक्षलागवडही सुरू आहे. मात्र, या नव्या झाडांकडे तथाकथित पर्यावरणप्रेमी फिरकत नाहीत, असा आरोप करत धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी ‘लाकूडतोड्या’ अशी टीका केल्यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “मी स्वतः हजारो झाडांची लागवड करून त्यांचं संगोपन करतोय. तरीही केवळ प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. मला काहीही म्हणू द्या, ते मोठे नेते आहेत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही महाजनांनी उत्तर दिलं. “फडणवीस केवळ विकासाची भाषा करतात. विरोधकांकडे मुद्दे उरलेले नाहीत, म्हणून निवडणुका जवळ आल्या की ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज काढतात,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
यावेळी महाजन यांनी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेतील दीर्घ सत्ताकाळ, कोरोना काळातील आरोप आणि सलग निवडणूक अपयशाचा उल्लेख करत त्यांनी दावा केला की, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीच विजयी होईल आणि जनतेचा विश्वास पुन्हा सिद्ध होईल.




