स्टार प्रवाहवरील एका लोकप्रिय मालिकेबाबत बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या 5 जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. मधुराणी प्रभुलकर आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका दररोज सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. या नव्या मालिकेसाठी वाहिनीने आपल्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये बदल केले असून रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता रात्री 10.30 वाजता हलवण्यात आली आहे.
मात्र, याच वेळेत आधीपासूनच गिरीजा प्रभू (Girija Prabhu) आणि मंदार जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे या मालिकेचं पुढे काय होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. तथापि, वाहिनीकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका 28 एप्रिल 2025 रोजी सुरू झाली होती. कावेरी आणि यश यांची प्रेमकथा या मालिकेचा केंद्रबिंदू होती. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच ही मालिका लवकरच पडद्याआड जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या मालिकेत कावेरी धर्माधिकारी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गिरीजा प्रभूने सोशल मीडियावर दिलेल्या संकेतामुळे या चर्चांना दुजोरा मिळत असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.




