spot_img

Start Up : नोकरी करून कंटाळा आलाय? तर व्यवसाय सुरू करण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्याच!

spot_img

योग्य नियोजन, संयम आणि समजूतदार निर्णय घेतले तर व्यवसायातील अपयश नक्कीच टाळता येऊ शकते.

आजच्या काळात अनेक जण नोकरीच्या मर्यादांमुळे कंटाळलेले आहेत, तर काहीजण नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र, व्यवसाय सुरू करणं जितकं आकर्षक वाटतं, तितकंच ते जबाबदारीचं आणि आव्हानात्मकही असतं. योग्य तयारी नसेल तर मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच व्यवसाय सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.

सखोल रिसर्च – यशाची पहिली पायरी

कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. संबंधित उद्योगातील संधी, अडचणी, स्पर्धा आणि उपाययोजना यांची संपूर्ण माहिती घ्या. त्या क्षेत्रात आधीपासून काम करणाऱ्या अनुभवी लोकांशी चर्चा करा. उत्पादन खर्च, लागणारे भांडवल, संभाव्य नफा, सप्लायर, डीलर नेटवर्क आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी याचा अंदाज आधीच बांधलेला असेल तर पुढचा प्रवास सोपा होतो.

सुरुवातीला नफा नसेल, हे गृहीत धरा

अनेक जण व्यवसाय सुरू करताना लगेचच नफा मिळेल अशी अपेक्षा ठेवतात, पण वास्तव वेगळं असतं. कोणताही व्यवसाय स्थिर होण्यासाठी आणि बाजारात नाव कमावण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. या काळात उत्पन्न कमी किंवा शून्य असू शकतं. त्यामुळे या कालावधीत व्यवसाय आणि घरखर्च स्वतःच्या बचतीतून चालवता येईल इतकं आर्थिक नियोजन असणं अत्यावश्यक आहे.

कंपनीची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवा

फक्त पैसा गुंतवून सगळं काम इतरांवर सोपवणं ही मोठी चूक ठरू शकते. व्यवसायाचा मालक म्हणून तुम्हाला प्रत्येक छोट्या-मोठ्या घडामोडीची माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी विश्वासार्ह, अनुभवी आणि कामात निष्णात अशी कोर टीम उभी करावी लागते. टीमकडून नियमित अपडेट्स घेणं आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय राहणं यामुळे व्यवसाय योग्य दिशेने पुढे जातो.

योग्य लोकेशनची निवड करा

व्यवसाय कुठे सुरू करायचा याचाही नीट विचार करावा. मनुष्यबळ सहज मिळेल, वीज-पाणी, वाहतूक आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असतील असं ठिकाण निवडणं फायदेशीर ठरतं. सुरुवातीला दिखावा टाळावा. महागडं, आलिशान ऑफिस घेण्याऐवजी साध्या जागेतूनही यशस्वी व्यवसाय उभा राहू शकतो. एकदा व्यवसाय नफ्यात आला की मगच मोठ्या जागेचा विचार करावा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ