‘प्रेमाची गोष्ट 2’ मधील नवं गाणं तरुणाईच्या मनात घर करतंय
मराठमोळ्या नृत्यांगना गौतमी पाटीलच्या ठेका धरून तरुणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अदांनी पुन्हा एकदा सगळ्यांना वेड लावलं आहे. ‘प्रेमाची गोष्ट 2’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील तिसरं गाणं ‘दिसला गं बाई दिसला 2.0’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, आणि यानं सोशल मीडियापासून ते रसिकांच्या प्लेलिस्टपर्यंत सगळीकडे खळबळ माजवली आहे. गौतमीच्या उत्स्फूर्त नृत्याने आणि ललित प्रभाकरच्या दमदार साथीने हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं आहे.एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या या चित्रपटातील ‘दिसला गं बाई दिसला 2.0’ (Disla G Bai Disla) हे गाणं जुन्या आठवणींना नवी चमक देतंय. राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या संगीताने सजलेलं, तर जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांच्या बोलांनी रंगलेलं हे गाणं राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या मधुर आवाजामुळे आणखी खुललं आहे. पॉल मार्शल (Paul Marshall) यांच्या नृत्यदिग्दर्शनाने गाण्याला एक जोशपूर्ण लय प्राप्त झाली आहे. या गाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक मराठी ताल आणि आधुनिक बीट्स यांचा सुरेख मेळ.
गौतमीच्या स्फूर्तिदायी सादरीकरणाने हे गाणं तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे (Satish rajwade) यांनी सांगितलं, “हे गाणं बनवताना आम्ही तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवलं. जुन्या गाण्याचा आत्मा कायम ठेवत त्याला नवं रूप द्यायचं होतं. गौतमीच्या उत्साहाने आणि तिच्या परफॉर्मन्सने हे गाणं खऱ्या अर्थाने जिवंत झालं.”निर्माते संजय छाब्रिया यांनीही उत्साह व्यक्त केला, “’प्रेमाची गोष्ट 2’ मधील पहिल्या दोन गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता ‘दिसला गं बाई दिसला 2.0’ ने हा उत्साह आणखी वाढला आहे. जुन्या ठेक्याला नव्या तालाची जोड हाच या गाण्याचा खरा गाभा आहे.”ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट २१ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास’ घेऊन येणारा हा सिनेमा आणि त्यातील हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल!




