टेस्ट सीरीज पराभवानंतर वाढलेल्या टीकेवर गंभीरांची जोरदार प्रतिक्रिया; आयपीएल फ्रेंचायजी मालकाला अोढलं धारेवर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) सतत टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोशल मीडियावरून ते पत्रकार परिषदांपर्यंत त्यांच्यावर होत असलेले प्रश्न आणि चर्चा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही जोर धरत आहे. या सर्व परिस्थितीमुळे आता गंभीरांचा संयम सुटत चालल्याचे दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) वनडे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर गंभीर पत्रकार परिषदेला उपस्थित झाले. मैदानात भारताने 9 विकेट्स राखून मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या आनंदापेक्षा प्रश्नांच्या मालिकेने गंभीर अधिक नाराज झाले. टेस्ट सीरीज पराभवानंतर होत असलेल्या सातत्यपूर्ण टीकेबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
गंभीर म्हणाले, “पहिल्या टेस्टमध्ये आपल्या कर्णधाराने दोन्ही डावांत फलंदाजीच केली नाही, हे लोक आणि मीडिया सोयीस्करपणे विसरतात. क्रिकेटशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींवर चर्चा केली जाते. एका IPL मालकाने तर स्प्लिट कोचिंगवर भाष्य केले. प्रत्येकाने आपल्या कामाच्या मर्यादेत राहायला हवं. आम्ही तुमच्या कामात हस्तक्षेप करत नाही, मग तुम्हाला आमच्या क्षेत्रात बोलण्याचा अधिकार कसा?”
त्यांच्या या वक्तव्याने IPL फ्रेंचायजी दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदल यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधल्याचे स्पष्ट झाले. टेस्ट सीरीज हरल्यानंतर जिंदल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय टीमला स्प्लिट कोचिंगची गरज असल्याचे म्हटले होते. म्हणजे टेस्ट आणि लिमिटेड ओवर्स संघासाठी वेगवेगळे कोच ठेवावेत अशी मागणी.
भारतीय क्रिकेटमध्ये स्प्लिट कोचिंगची चर्चा याआधीही अनेक वेळा झाली होती. रवी शास्त्री किंवा राहुल द्रविड यांच्या काळातही अशा मतप्रवाहांना वाव होता, मात्र त्यांनी कधीही व्यक्तिशः प्रतिक्रिया दिली नव्हती. गंभीर यांनी मात्र थेट टीकाकारांना उत्तर देताच त्यांच्या आक्रमक शैलीवर नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. टीम वनडे मालिका जिंकूनही कोच गंभीर यांच्याभोवतीचा वाद शमण्याची चिन्हे मात्र दिसत नाहीत.




