भारतीय टीमचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर सध्या प्रश्नांचे वादळ उसळले आहे. त्यांच्या कोचिंगमध्ये भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन ट्रॉफी जिंकत चमक दाखवली असली, तरी टेस्ट क्रिकेटमध्ये संघ सातत्य राखू शकलेला नाही. विशेष म्हणजे, भारताने स्वतःच्या भूमीत मागील वर्षभरात तब्बल 4 टेस्ट सामने गमावले. जे काही वर्षांपूर्वी जवळपास अकल्पनीय होतं. या स्थितीमागे अनेक कारणं असली तरी, गंभीर यांनी केलेल्या सततच्या संघरचनेतील प्रयोगांना मोठ्या प्रमाणावर दोष दिला जात आहे. विशेषत: नंबर 3 च्या महत्त्वाच्या स्थानावर सातत्याने फेरबदल होत आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कोलकाता टेस्टमध्ये त्याचे ताजे उदाहरण दिसले. इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (West India) नंबर 3 वर खेळूनही अपेक्षित कामगिरी न करू शकलेल्या साई सुदर्शनला अचानक बाहेर बसवण्यात आले आणि त्याजागी वॉशिंग्टन सुंदरला बढती देण्यात आली. गंभीर कोच झाल्यापासून आतापर्यंत सात भिन्न खेळाडूंनी नंबर 3 वर बॅटिंग केली आहे ही आकडेवारीच गोंधळ किती वाढला हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. सुरुवातीला शुभमन गिलला ही जबाबदारी देण्यात आली होती. पण विराट कोहलीने टेस्टमधून निवृत्ती जाहीर करताच गिलला नंबर 4 वर हलवण्यात आलं, जिथे त्याने जबरदस्त कामगिरी करत आपली जागा पक्की केली. मात्र, गिलच्या उचलत्या फॉर्ममध्येही टीमला नंबर 3 साठी योग्य पर्याय मिळालेला नाही.
राहुल द्रविड (Rahul Daravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या काळात नंबर 3 व नंबर 4 स्थिर आणि भक्कम होते. त्यांची परंपरा पुढे नेणारा चेतेश्वर पुजारा बाहेर गेल्यानंतर मात्र हा महत्त्वाचा स्थान ‘प्रयोगशाळा’ बनून बसला आहे. भारतीय टेस्ट फलंदाजीची ‘हाडाची’ पोझिशन असलेल्या नंबर 3 वरचा खेळाडू निश्चित न झाल्याने कोच गंभीर यांच्यावर टीकेची धार अधिक तीक्ष्ण होत चालली आहे. आता या सततच्या बदलांऐवजी विश्वास ठेवून एखाद्या फलंदाजाला घडवण्याची वेळ आली आहे, असे अनेकांचे मत आहे.




