spot_img

Gaurav More : हिंदी शो करण्यामागचं सत्य गौरव मोरेने केलं उघड

spot_img

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ या नावाने ओळख मिळवणारा अभिनेता आणि कॉमेडियन गौरव मोरे अवघ्या काही काळात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. अफलातून विनोदबुद्धी, अचूक टायमिंग आणि साध्या माणसातील कॉमेडी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. शोमधून त्याला भरपूर लोकप्रियता, आर्थिक स्थैर्य आणि ओळख मिळत असतानाही त्याने अचानक या कार्यक्रमातून ब्रेक घेतल्याने अनेकांना धक्का बसला होता.

हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव हिंदीतील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये झळकला. मात्र मराठीतील यशस्वी शो सोडून हिंदीकडे वळण्यामागचं खरं कारण त्याने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

‘9 माईंड क्रिएशन’ला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरे म्हणाला, “माझ्याकडे सतत एकसारखेच रोल यायचे. कुठेतरी घरगुती सीन, मध्ये मी एंट्री घ्यायचो, थोडी गडबड, आणि मग कॉमेडी. सुरुवातीला ते छान वाटत होतं, पण सतत तेच तेच करत राहिल्यामुळे मला कंटाळा आला. त्यामुळेच मी जवळपास वर्षभर ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला.”

तो पुढे म्हणाला, “त्या काळात मी ‘मॅडनेस मचायेंगे’चे काही एपिसोड केले, कारण मला हिंदीतून ऑफर आली होती. पण याचा अर्थ असा नव्हता की मला मराठी काम करायचंच नाही. मला फक्त थोडा ब्रेक हवा होता.”

गौरव मोरेने याआधी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘हास्य सम्राट’ यांसारख्या कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला होता. मात्र अभिनय आणि कॉमेडीचा फारसा अनुभव नसल्यामुळे त्या टप्प्यावर पुढे जाता आलं नाही, असं त्याने प्रामाणिकपणे मान्य केलं. त्या काळात तो अनेकदा स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्टँड-अप कॉमेडी करत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आयुष्य कसं बदललं, याबद्दल बोलताना गौरव भावुक झाला होता. “या शोने मला सगळं काही दिलं – पैसा, प्रसिद्धी आणि स्थैर्य. आज मी देशातील महागड्या मोबाईलपैकी एक वापरतो. दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे बस किंवा ट्रेनने प्रवास करायलाही पैसे नव्हते. आज माझ्याकडे स्वतःची कार आणि बाईक आहे. एकेकाळी पायात घालायला शूज नव्हते, आज शूजचं कलेक्शन आहे,” असे तो म्हणाला.

तो पुढे म्हणाला, “एकेकाळी माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे काही मित्रांनी माझ्याशी संपर्क तोडला होता. पण आज तेच लोक माझ्या घरी येतात, माझ्यासोबत फोटो आणि सेल्फी काढतात. हे सगळं हास्यजत्रेमुळे शक्य झालं.” गौरव मोरेचा हा प्रवास संघर्षातून यशाकडे नेणारा असून, ब्रेक घेतल्यानंतरही तो पुन्हा नव्या दमाने प्रेक्षकांसमोर येईल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ