चुकीचं पाणी, अयोग्य जागा आणि खतांचा गैरवापर रोपांच्या वाढीला ठरतो घातक
आजकाल शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत अनेकांना बागकामाची आवड लागलेली दिसते. घराचं अंगण असो, टेरेस गार्डन असो किंवा बाल्कनी—प्रत्येक ठिकाणी विविध रोपांनी हिरवळ फुललेली असते. मात्र थंडीत किंवा ऋतू बदलताना अनेकांच्या रोपांची अवस्था खराब होते. योग्य पाणी दिलं तरी रोपं कोमेजतात किंवा सुकतात, अशी तक्रार अनेक जण करतात. ही अडचण फक्त हिवाळ्यातच नाही, तर वर्षभर कधीही उद्भवू शकते. त्यामुळे रोपं तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
पाणी देताना घ्या काळजी
नवीन लावलेली रोपं लवकर वाढावीत, या अपेक्षेने अनेकजण त्यांना जास्त पाणी घालतात. मात्र हा गैरसमज रोपांसाठी घातक ठरू शकतो. जास्त पाणी दिल्यास मुळांभोवती पाणी साचते आणि मुळांना आवश्यक असलेली हवा मिळत नाही. परिणामी रोपांची वाढ थांबते आणि ती सुकू लागतात. त्यामुळे पाणी देण्याआधी माती हाताने तपासावी. माती कोरडी वाटली तरच पाणी द्यावे. तसेच कुंड्यांच्या तळाशी पाणी निचरा होण्यासाठी छिद्रे असणे अत्यंत गरजेचे आहे.
योग्य जागेची निवड महत्त्वाची
सर्व रोपांना एकसारखा सूर्यप्रकाश लागत नाही. काही रोपांना थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तर काही रोपं सावलीत चांगली वाढतात. अनेकदा मनी प्लांट किंवा स्नेक प्लांटसारखी रोपं खिडकीजवळ उन्हात ठेवली जातात, पण जास्त प्रकाशामुळे त्यांची पाने जळू शकतात. त्यामुळे रोप कोणत्या वातावरणात चांगलं वाढतं, याची माहिती घेऊनच त्याची जागा ठरवावी.
खतांचा योग्य वापर करा
रोपांच्या निरोगी वाढीसाठी खतांचा मोठा वाटा असतो. केवळ पाणी देऊन रोपं जोमाने वाढतात, असा समज चुकीचा आहे. मात्र अति रासायनिक खतांचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्यामुळे सेंद्रिय किंवा योग्य प्रमाणात खतांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. ठराविक कालावधीनंतर रोपांना आवश्यक पोषक घटक मिळतील, याची काळजी घेणं गरजेचं आहे.




