spot_img

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील आलदंडीमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू

spot_img

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि मूलभूत आरोग्य सुविधांअभावी गरोदर मातेला मृत्यूशी झुंजावे लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा या नऊ महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटतील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यातील अपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

आलदंडी टोला गावात रस्ता नाही. त्यामुळे वेळेवर मदत मिळावी या आशेने आशा किरंगा नववर्षाच्या दिवशी पतीसोबत जंगलाच्या वाटेने 6 किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी निघाल्या होत्या. मात्र पायापीटमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा यांचीही प्राणज्योत मालवली. मृत्यूनंतरही या माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड थांबली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पुन्हा 40 किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आले. जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यू पश्चातही उदासीन व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिवंतपणी रस्त्याअभावी करावी लागलेली पायपीट मृत्यूनंतरही थांबली नाही, ही बाब अधिक वेदनादायक ठरली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील रस्ते (Road), आरोग्य केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता यामुळे निष्पाप जीव गमवावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ