गडचिरोली शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील कारगिल चौक परिसरात रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मोकाट डुक्कराने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भाजपचे नगरसेवक आणि स्वच्छता व आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे (वय 56) यांचा मृत्यू झाला. काटवे हे रात्री दुचाकीवरून घरी जात असताना अचानक डुक्कर समोर आल्याने अपघात झाला. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
काटवे यांनी यापूर्वी भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्यावर स्वच्छता आणि आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे.




