सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि Gen Z संस्कृतीमुळे नात्यांवर मित्रांचा प्रभाव वाढतोय; सुरक्षिततेपासून ते निर्णयांपर्यंत दिसतोय बदल
आजच्या डिजिटल युगात प्रेम ही फक्त दोन लोकांमधील गोष्ट राहिलेली नाही. डेटिंग अॅप्स, सोशल मीडिया आणि सतत बदलणाऱ्या रिलेशनशिप ट्रेण्ड्समुळे मित्रांचा सहभाग प्रेमकथेत मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. यालाच सध्याच्या भाषेत ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’ असं म्हटलं जात आहे.
पूर्वी आवड निर्माण झाली की थेट डेटिंग सुरू व्हायचं. मात्र आता “माझ्या मित्रांना ही व्यक्ती पसंत पडेल का?” हा विचार आधी डोक्यात येतो. डेटला जाण्यापूर्वी प्रोफाइल तपासणं, मित्रांकडून मत घेणं, जुन्या पोस्ट्स पाहून स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करणं हे सर्वसाधारण झालं आहे. भारतासारख्या सामाजिक दृष्टिकोन असलेल्या देशात मित्रांचा सल्ला लोकांना अधिक सुरक्षित वाटतो.
आज अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घेण्याआधी मित्रांच्या अनुभवांवर विश्वास ठेवतात. नात्यांमधील फसवणूक, भावनिक वेदना किंवा चुकीचे निर्णय मित्रांनी जवळून पाहिलेले असतात. त्यामुळे सावधगिरीचा सल्ला अधिक ठळक होतो. काही वेळा लहान गोष्टीही मोठा धोका म्हणून समोर येतात आणि त्यामुळे नात्याबाबत संभ्रम वाढतो.
आता तर मित्रांचा व्हॉट्सअॅप ग्रुपच जणू नवीन डेटिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. डेटआधी आउटफिटवर चर्चा, डेटनंतर अनुभव शेअर करणं, चॅट्सचे स्क्रीनशॉट पाठवणं हे सामान्य झालं आहे. विशेषतः महिलांसाठी मित्र भावनिक आधारासोबतच सुरक्षिततेचा मजबूत आधार ठरत आहेत. लाईव्ह लोकेशन शेअर करणं, इमर्जन्सी कोड ठरवणं आणि वेळेवर कॉल करणं यातून हा सकारात्मक बदल दिसतो.
मात्र या ट्रेण्डची एक नकारात्मक बाजूही आहे. जास्त सल्ले घेतल्यामुळे स्वतःचं मत धूसर होऊ शकतं. मित्रांचे जुन्या अनुभवांवर आधारित दृष्टिकोन तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतात. कधी कधी साध्या सवयीही ‘रेड फ्लॅग’ वाटू लागतात. तर मित्रांना एखादी व्यक्ती खूप आवडली असल्यास, नातं सोडणं मानसिकदृष्ट्या कठीण होतं.
Gen Z आणि तरुण मिलेनियल्समध्ये हा ट्रेण्ड अधिक प्रकर्षाने दिसतो आहे. त्यांच्यासाठी मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सामाजिक जोड महत्त्वाची असल्यामुळे प्रेमही समूहाचा भाग बनत आहे.
तज्ज्ञांच्या मते, ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’ पूर्णपणे चुकीचं नाही. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो, मात्र अंतिम निर्णय स्वतःच्या भावना आणि अनुभवांवर आधारित असणं गरजेचं आहे. प्रेम हे वैयक्तिक असतं, जरी ते समाजात घडत असलं तरी.




