सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
एसटी को-ऑपरेटिव बँक (ST Co-operative Bank) ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते.मात्र आज एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे.शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Party) आणि सदावर्ते गट यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे.
या घटनेबाबत एका संचालकाने सांगितले की, आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे राडा झाला. या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत.
एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील फ्री स्टाईल राड्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकाच खळबळ उडाली. ज्यात बैठकीत एक व्यक्ती संचालक मंडळाच्या बैठकीचा व्हिडीओ काढण्यास विरोध करत असल्याचे दिसून येतंय. तसेच सुरू असलेल्या बैठकीतील माहिती बाहेर जाता कामा नये असेही ही व्यक्ती सांगत आहे. मात्र, त्याचवेळी राड्याला तोंड फुटतं. समोरील व्यक्तीच्या सांगण्याला विरोध होताच त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तीच्या बाजूची व्यक्ती तावातावात उठते आणि थेट बाटली फेकून मारते. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरु होते. यावेळी प्रचंड शिवीगाळ देखील करण्यात आली. व्हायरल व्हिडीओमध्ये हा गदारोळ बघायला मिळत आहे.




