नवी मुंबईत दोन ठिकाणी लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू
नवी मुंबईतील (New Mumbai) वाशीमध्ये सेक्टर १४ एम जी कॅाम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत (Fire) चार जणांचा मृत्यूझाला आहे. या दुर्घटनेत एका लहान बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री 12.40 च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि 11 व्या आणि 12 व्या मजल्याला आगीने वेढा घेतला. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44) आणि पुजा राजन (वय 39) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत इमारतीमधील इतर लोकांना तात्काळ बाहेर काढले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. तर आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून (Police) या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास करण्यात येत आहे.
कामोठेमधील भीषण आगीत माय-लेकीचा
नवी मुंबईतील कामोठे (Kamothe) येथील सेक्टर ३६ मधील आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीतील रुम क्रमांक ३०१ मध्ये सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाल्याने आग लागली.या आगीत आई आणि मुलगी अडकून पडल्याने दोघींचा होरपळून मृत्यू झाला. या दोघी आतमध्ये कशा अडकल्या याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे.




