व्लॉगमुळे अफाट कमाई; स्वयंपाकी दिलीपची कर्जमुक्ती, शिक्षण आणि घराचेही स्वप्न झाले पूर्ण
चित्रपट दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेली फराह खान (Farah Khan) आता सोशल मीडियावरही तितकीच गाजत आहे. गेल्या दीड वर्षांपासून तिने यूट्यूबवर व्लॉगिंग सुरू केलं आणि पाहता पाहता तिचे 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत. प्रसिद्ध कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्यासाठी स्वयंपाक करणारे तिचे व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत.
फराहसोबत तिचा कूक दिलीपसुद्धा प्रत्येक व्लॉगमध्ये दिसतो आणि या जोडीची मजेशीर खोडी चाहत्यांना विशेष भावते. यूट्यूबमधून होणाऱ्या कमाईबाबत फराहने नुकताच धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली, “फक्त एका वर्षात मी इतके पैसे कमावलेत की दिग्दर्शनातील संपूर्ण कारकिर्दीतही कधी मिळाले नाहीत.”
फराहने दिलीपच्या आयुष्यातही मोठा बदल घडवून आणला आहे. त्याचे घरातील सर्व कर्ज तिने फेडून टाकले असून मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षणाची सोय करून दिली आहे. दिलीपच्या एका मुलाला स्वयंपाकाच्या डिप्लोमामध्ये प्रवेशदेखील मिळवून दिला आहे. गावात दिलीपचे (Dilip) नविन घर उभे राहत असून ब्रँड कोलॅबोरेशनची संधीही फराह त्याला मिळवून देते आहे.
आज दिलीप फक्त एक स्वयंपाकी नसून, जाहिराती आणि व्लॉगमुळे स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. फराह खानच्या या डिजिटल सफरीमुळे दिलीपचे आणि त्याच्या कुटुंबाचे नशीब अक्षरश: उजळले आहे.




