उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आव्हानात्मक असते. घाम, धूळ आणि कडक उन्हामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. याशिवाय पिंपल्स, बारीक पुरळ आणि टॅनिंगसारख्या समस्या वाढतात. अशा वेळी केमिकल प्रॉडक्ट्सऐवजी घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात.
नैसर्गिक आणि चमकदार त्वचेसाठी पपई आणि बेसनपासून तयार केलेला फेसपॅक एक उत्तम पर्याय आहे. हा फेसपॅक त्वचेला स्वच्छ ठेवण्यासोबतच तिला आवश्यक पोषण देतो.
कसा तयार कराल फेसपॅक?
पिकलेल्या पपईचा अर्धा वाटी गर घ्या आणि त्यात 2 ते 3 चमचे बेसन मिसळा. त्यानंतर त्यात 1 ते 2 थेंब गुलाबपाणी घालून मिश्रण तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर समानपणे लावा. सुमारे 15 मिनिटांनी पॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
काय आहेत फायदे?
हा फेसपॅक त्वचेवरील मृत पेशी दूर करून त्वचा ताजी आणि स्वच्छ ठेवतो. बेसनामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते, ज्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते. पपईतील गुणधर्म टॅनिंग कमी करण्यास मदत करतात. तसेच या नैसर्गिक घटकांमुळे त्वचेला पोषण मिळून ती मऊ आणि चमकदार दिसते.
नियमित वापर केल्यास त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते आणि उन्हाळ्यातही त्वचा निरोगी राहते.




