तीन लग्न आणि चार अफेअर्सनंतरही नशिबी आली एकटं जगण्याची वेळ; करिअरच्या शिखरावरून कोसळलेलं एक अधुरं स्वप्न
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशा अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी पहिल्याच चित्रपटातून यशाचे आभाळ कवेत घेतले, मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांना नशिबाने कधीच साथ दिली नाही. यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निकाह’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि पहिल्याच संधीत त्या रातोरात सुपरस्टार झाल्या. या चित्रपटातील ‘दिल के अरमा आँसुओं में बह गये’ हे त्यांनी गायलेले गाणे आजही रसिकांच्या काळजाला हात घालते. मात्र, पडद्यावर प्रेमाचा नवा अर्थ समजावून सांगणाऱ्या सलमा आगा यांचे स्वतःचे खासगी आयुष्य मात्र अनेक वादळांनी ग्रासलेले राहिले.
कराचीमध्ये जन्मलेल्या सलमा आगा यांचा चित्रपटसृष्टीशी जुना ऋणानुबंध होता. त्यांच्या आजीचे लग्न राज कपूर यांचे मामा जुगल किशोर यांच्याशी झाले होते, तर त्यांच्या आई नसरीन यांनीही ‘शाहजहाँ’ सारख्या अजरामर चित्रपटात काम केले होते. अशा वारशातून आलेल्या सलमा यांनी करिअरमध्ये ‘कसम पैदा करने वाले’, ‘बॉबी’ आणि ‘फूलन देवी’ यांसारखे हिट सिनेमे दिले. मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत चढ-उतार येत राहिले. त्यांनी जावेद शेख, रहमत खान आणि मंजर शाह अशा तीन व्यक्तींशी विवाह केला, परंतु दुर्दैवाने त्यांचे एकही लग्न टिकू शकले नाही. तीन लग्नांशिवाय त्यांचे नाव उद्योजक महमूद सिप्रा यांच्यासह चार जणांशी जोडले गेले, पण तिथेही त्यांना प्रेम मिळाले नाही.
असे म्हटले जाते की, महमूद सिप्रा यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे सलमा आगा यांनी आपल्या भरभराटीला आलेल्या करिअरकडे दुर्लक्ष केले, ज्याचा फटका त्यांना व्यावसायिक आयुष्यात बसला. त्यांचे पती जावेद शेख यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, सलमा यांच्यामुळे ते स्वतः असुरक्षित झाले होते आणि त्यांना अनेक मोठ्या चित्रपटांच्या संधी सोडाव्या लागल्या होत्या. आज सलमा आगा चित्रपटसृष्टी आणि ग्लॅमरच्या जगापासून पूर्णपणे दूर आहेत. तीन वेळा बोहल्यावर चढून आणि अनेक प्रेमसंबंधांच्या चर्चांनंतरही, आज त्या एकाकी जीवन जगत आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या एका प्रतिभावान कलाकाराचा हा प्रवास ‘दोन टोकांचे आयुष्य’ कसे असते, याचेच दर्शन घडवतो.




