मराठी आणि हिंदीच्या वादावरून राज्यात राजकीय वातावरण तापले; उद्धव सेना व मनसेकडून सुर्वे यांच्यावर जोरदार टीका, तर सरकारकडून बचावाची भूमिका
राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला मराठी–हिंदी वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी म्हटले की, “मराठी माझी आई आहे, पण उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि मनसेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्धव सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सुर्वे यांच्यावर टीका करताना म्हटले, “२०२२ साली आईलाच नमस्कार करून त्यांनी घर सोडलं. आता त्यांना आई आणि माता यातला फरकही कळेनासा झाला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तर मनसेनेही मतांच्या राजकारणासाठी सुर्वे यांनी असं विधान केल्याचा आरोप केला.
वाद वाढताच अखेर प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी माफी मागून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मराठी माझी मायमावली आहे. माझ्याकडून अनावधानाने तो शब्द निघाला. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत त्यांनी हात जोडून माफी मागितली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी सुर्वे यांच्या बाजूने स्पष्टीकरण देत म्हटले की, “त्यांच्याकडून चुकून तो शब्द बाहेर पडला. त्यांनी तत्काळ माफीही मागितली आहे. काहीजण या प्रकरणाचा राजकीय फायदा करून घेत आहेत,” असे सामंत म्हणाले.
सरकारकडून सुर्वे यांचा बचाव करण्यात आला असला, तरी या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाला अधिक तीव्र राजकीय रंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




