दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्यांनी केली हल्लाबोल; रक्षा खडसे यांच्या खोलीतही चोरी, पोलिसांकडून तपास सुरू
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगावमधील (Jalgaon) शिवराम नगर येथील निवासस्थानी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. खडसे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटातील सोनं आणि रोकड लंपास केली आहे.
ही घटना दिवाळीनिमित्त खडसे कुटुंब बाहेरगावी असताना घडली. त्यावेळी घरातील सुरक्षारक्षकही सुट्टीवर असल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत घरातील मजले आणि खोल्यांची उचकापाचक केली.
सकाळी नेहमीप्रमाणे घरकामगार साफसफाईसाठी आल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खोलीत ठेवलेल्या 5 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे 35 हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत. तसेच त्यांच्या मुलगा गोपाळ खडसे आणि सून यांच्या खोलीतूनही सोनं लांबवल्याचे समोर आले आहे. रक्षा खडसे यांच्या खोलीतील कपाटांचेही कुलूप तोडण्यात आले आहे.
या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासण्याचे काम पोलीस सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती. त्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच आता खडसे यांच्या घरातील चोरीने नवीन प्रश्न निर्माण केले आहेत.
खडसे यांनी सांगितले, “रात्री नेमक्या कोणत्या वेळी चोरी झाली हे सांगता येत नाही. सकाळी लक्षात आलं आणि पोलिसांना त्वरित कळवण्यात आलं. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी सुरू केली आहे.” सध्या पोलिसांकडून परिसरातील तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




