मेणबत्ती पेटवा आणि खा! फूड ट्रेंडमध्ये ‘एडिबल कँडल’ची धूम
आजच्या काळात जेवण म्हणजे फक्त भूक भागवणं नाही, तर एक खास अनुभव बनला आहे. याच अनुभवप्रधान ट्रेंडमध्ये आता फूड इंडस्ट्रीत एक अनोखी संकल्पना चर्चेत आली आहे. ‘एडिबल कँडल’. दिसायला अगदी मेणबत्तीसारखी असलेली ही कँडल पेटवली जाते आणि काही वेळात ती वितळून थेट खाण्यासाठी तयार होते.
ही कँडल प्रत्यक्षात फ्लेवर्ड बटरपासून बनवलेली असते. जेवणाच्या टेबलवर ठेवलेली कँडल पेटवल्यावर त्यातून गरम, सुगंधी बटर हळूहळू बाहेर येतं. हे बटर ब्रेड, टोस्ट किंवा बनसोबत खाल्लं जातं. त्यामुळे जेवणाचा साधा अनुभवही लक्झरी डिनरसारखा वाटतो.
डिनर डेट, खास सेलिब्रेशन किंवा होम पार्टीमध्ये एडिबल कँडलमुळे सादरीकरण अधिक आकर्षक होत आहे. वेगळा लूक, हटके कल्पना आणि जबरदस्त चव यामुळे ही संकल्पना सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
एडिबल कँडल म्हणजे काय?
बटर, लसूण, हर्ब्स आणि हलक्या मसाल्यांचं मिश्रण कँडलच्या आकारात सेट केलं जातं. यामध्ये फूड-ग्रेड वात बसवली जाते. पेटवल्यावर हे मिश्रण हळूहळू वितळून सॉससारखं वापरता येतं.
घरीही करता येते तयार
विशेष म्हणजे एडिबल कँडल घरीही सहज बनवता येते. अनसॉल्टेड बटर, लसूण, थोडं मीठ आणि आवडते हर्ब्स मिसळून मोल्डमध्ये ओतलं की काही वेळात कँडल तयार होते.
सर्व्ह करताना घ्या काळजी
कँडल नेहमी उष्णतेला सहन करणाऱ्या प्लेटमध्ये ठेवा. खाण्याआधीच पेटवा आणि फार वेळ जळू देऊ नका. वापरली जाणारी वात फूड-ग्रेड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
चवीसोबत ‘वॉव’ अनुभव देणारी एडिबल कँडल सध्या फूडप्रेमींमध्ये नवा ट्रेंड ठरत आहे. काहीतरी हटके आणि वेगळं ट्राय करायचं असेल, तर हा फूड एक्सपेरिमेंट नक्कीच लक्ष वेधून घेईल.




