इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांवरही दिसू लागला आहे. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनस स्टडीज (ISBS) या संस्थेचे ८४ एमबीए विद्यार्थी सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे दुबईचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आल्याने त्यांच्या परतीचा प्रवास थांबला आहे. हे सर्व विद्यार्थी पाच दिवसांच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी दुबईला गेले होते. त्यापैकी ४० जण शनिवारी पुण्यात परतणार होते, तर उर्वरित ४४ जण रविवारी परत येण्याचे नियोजन होते. मात्र, एअरस्पेस बंद झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांना तेथेच थांबावे लागले आहे.
संस्थेचे डीन जनार्दन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ८४ विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यामध्ये ४२ मुलगे आणि ४२ मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एका हॉटेलमध्ये हलवण्यात आले असून संस्थेचे अधिकारी त्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. दरम्यान, इंदिरा स्कूल ऑफ बिझनस स्टडीजच्या अध्यक्षा तारिता शंकर यांनीही विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर मायदेशी परत आणता येईल. सध्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी संस्थेकडून सर्व आवश्यक पावले उचलली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.




