होर्मुज खाडीत अमेरिका पडली एकटी, रशिया-चीन इराणच्या पाठीशी; सोशल मीडियावरील ‘फेक न्यूज’ नडली
मध्य आशियातील युद्धाने आता रौद्र रूप धारण केले असून, याचे पडसाद थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि भारतीय नागरिकांवर उमटू लागले आहेत. इराणने दुबई विमानतळावर केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण आखातात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर विमानतळावरील उड्डाणे काही काळ स्थगित करण्यात आली असली, तरी भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे या घटनेशी संबंधित ‘फेक व्हिडिओ’ सोशल मीडियावर पसरवल्याच्या आरोपाखाली तब्बल १९ भारतीय नागरिकांना युएई (UAE) प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने बनावट व्हिडिओ तयार करून भीती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश युएईच्या अटॉर्नी जनरलनी दिले आहेत.
दुसरीकडे, जागतिक राजकारणात अमेरिकेची कोंडी होताना दिसत आहे. होर्मुजची खाडी बंद झाल्याने तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून, अमेरिकेने मदतीसाठी साद घातली असतानाही अनेक मित्रराष्ट्रांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. याउलट, इराणला रशिया आणि चीनचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. इराणनेही आता उघडपणे रशिया-चीनकडून मिळणाऱ्या मदतीचा स्वीकार केला असून, अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी तेलाच्या किमतींमधील वाढ हेच त्यांचे मुख्य अस्त्र ठरत आहे.
या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांतील भारतीय प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुबई विमानतळावरील सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना संबंधित विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून अफवा पसरवणे आता कायदेशीर कचाट्यात आणणारे ठरत असून, भारतीयांना परदेशात वावरताना सोशल मीडिया वापराबाबत अधिक सतर्क राहण्याचा इशारा या घटनेतून मिळत आहे.




