शूटिंगपूर्वीच चित्रपट सोडल्याने कायदेशीर नोटीस; दिग्दर्शक अभिषेक पाठकांनी केला संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा
‘धुरंधर’च्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर ‘दृश्यम 3’ मधून अचानक घेतलेल्या माघारीमुळे. अजय देवगणच्या लोकप्रिय ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागासाठी अक्षय खन्नाने करार केला होता. मात्र शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
करारावर स्वाक्षरी करूनही चित्रपट सोडल्यामुळे निर्माते कुमार मंगत पाठक चांगलेच संतप्त झाले असून, त्यांनी अक्षय खन्नावर यशाची हवा डोक्यात गेल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे, तर त्याला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे.
या वादावर आता ‘दृश्यम’ मालिकेचा दिग्दर्शक अभिषेक पाठकने प्रतिक्रिया दिली आहे. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने सांगितले की, सर्व तयारी पूर्ण झाली होती. अक्षयला कथाही आवडली होती, त्याच्या भूमिकेचा लूक आणि कॉस्च्युमसुद्धा ठरले होते. मात्र ‘धुरंधर’च्या प्रदर्शनाच्या अगदी एक दिवस आधी त्याने ‘दृश्यम 3’ न करण्याचा निर्णय कळवला.
या संदर्भात अजय देवगणशी चर्चा केल्यावर त्याने सर्व निर्णय दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर सोपवले. “हे तुमचं आणि निर्मात्यांचं प्रकरण आहे, काय करायचं ते तुम्ही ठरवा,” असं अजयने सांगितल्याचं अभिषेक पाठकने स्पष्ट केलं.
अभिषेकने पुढे सांगितले की, ‘दृश्यम 2’च्या कथानकावरच तिसऱ्या भागाची गोष्ट पुढे जाणार असल्याने पात्रांचा लूक शेवटच्या क्षणी बदलणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत अक्षयने हेअर विगची मागणी करणं अनावश्यक होतं, अशी टीकाही त्याने केली. तसेच, “मी अक्षयला आव्हान देतो की त्याने भविष्यात एक सोलो चित्रपट करून दाखवावा,” असं विधानही त्याने केलं.
दरम्यान, ‘दृश्यम 3’साठी अक्षय खन्नाने 21 कोटी रुपयांचं मानधन मागितल्याच्या चर्चांना अभिषेक पाठकने साफ नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, अजय देवगणच्या प्रमुख भूमिकेतील ‘दृश्यम 3’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




