माजी खासदार,प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत Dr. J. M. Waghmare यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक अभ्यासू व दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले आहे.
११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण प्रसार आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्य केले. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी विचारसरणीवर त्यांनी सखोल लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी भूमिकेची त्यांनी सातत्याने मांडणी केली.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMU) चे ते संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक रचना उभारण्यापर्यंत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे मोठे योगदान आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. Indian National Congress पक्षाकडून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. संसदेत त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिक्षण क्षेत्रात देशभर गाजलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे ते जनक मानले जातात. निकालाभिमुख, शिस्तबद्ध आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासपद्धतीची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली, ज्याचा प्रभाव आजही जाणवतो.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता लातूर जिल्ह्यातील कवठा (ता. औसा) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. वाघमारे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




