नाटो देशांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी; मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने ट्रम्प यांचा ‘एकला चलो रे’चा पवित्रा
इराणसोबतच्या युद्धाला महिना उलटला असून जागतिक राजकारण आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या कमालीचे आक्रमक दिसत असून, व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका विशेष इस्टर स्नेहभोजनादरम्यान त्यांनी दिलेल्या ४० मिनिटांच्या भाषणाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या कार्यक्रमात पत्रकारांना प्रवेश नसला तरी ट्रम्प यांच्या भाषणातील अंश आता समोर आले आहेत. “पाम संडेच्या दिवशी येशू राजा म्हणून जेरुसलेमला आले होते… आज लोक मलाही राजा म्हणतात, यावर तुमचे काय मत आहे?” असा अजब सवाल करत ट्रम्प यांनी स्वतःची तुलना ऐतिहासिक संदर्भांशी केली. विरोधकांच्या ‘नो किंग्स’ (No Kings) आंदोलनाचा समाचार घेताना त्यांनी आपली आक्रमक शैली पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मित्रदेशांच्या, विशेषतः ‘नाटो’ (NATO) देशांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “आम्ही जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आहोत, आम्ही वेळेला सर्वांना मदत केली, पण आज जेव्हा आम्हाला गरज आहे, तेव्हा एकही देश मदतीला धावून येत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ब्रिटनसारख्या जवळच्या मित्रदेशानेही थेट सहभागास नकार दिल्याने ट्रम्प यांनी त्यांना ‘भित्रे’ संबोधले आहे. “जे माझ्यासोबत चांगले राहतात, त्यांच्यासाठी मी शेवटपर्यंत लढतो, मग ती व्यक्ती कशीही असो,” असे म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांना आश्वस्त केले.
एकीकडे ट्रम्प इराणच्या वीज प्रकल्पांना आणि लष्करी तळांना उद्ध्वस्त करण्याची भाषा करत असताना, दुसरीकडे अमेरिकेच्या अंतर्गत भागात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. इराणसोबतच्या या युद्धामुळे सामान्य अमेरिकन नागरिक समाधानी नसून, अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करत आहेत. युद्धाचा हा निर्णय अमेरिकेला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या गोत्यात आणणारा असल्याचे मत आंदोलकांकडून व्यक्त होत आहे.
भाषणाच्या शेवटी ट्रम्प यांनी धार्मिक कार्ड खेळत “एक महान देश होण्यासाठी धर्माची आणि देवाची गरज असते,” असे विधान केले. स्वतःच्या ‘व्हाइट हाऊस बॉलरूम’ प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मला तर एक बॉलरूम बांधण्याची परवानगी सुद्धा सहजासहजी मिळत नाही, मग मी राजा कसा? ट्रम्प यांचे हे भाषण केवळ एक राजकीय विधान नसून, आगामी काळात इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिका आता कोणत्याही देशाला न जुमानता स्वतंत्रपणे पावले उचलणार असल्याचे स्पष्ट संकेत देणारे आहे.




