गॅस टंचाईमुळे उत्पादनावर संकट; कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे उद्योजक चिंतेत.
इराण आणि अमेरिकेमधील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता जागतिक इंधन आणि गॅस पुरवठ्यावर दिसू लागला आहे. या परिस्थितीचा फटका देशातील उद्योगांनाही बसू लागला असून डोंबिवली एमआयडीसी परिसरातील शंभराहून अधिक कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने आधीच हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही दिसून येत आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील अनेक उद्योगांकडे सध्या केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांना पुन्हा पर्यायी इंधनाचा विचार करावा लागत आहे. मात्र हे पर्यायी इंधन देखील मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्यामुळे उद्योजकांसमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. गॅस टंचाई कायम राहिल्यास उत्पादन प्रक्रिया थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात-निर्यात व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढत असून त्यामुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे.
या परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने तातडीने लक्ष देत गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी डोंबिवली एमआयडीसीमधील उद्योजकांकडून करण्यात येत आहे.




