जाणून घ्या तज्ज्ञांचं मत आणि भात खाण्याची योग्य वेळ
भारतीय जेवणात भाताला विशेष स्थान आहे. विशेषतः महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि बंगालमध्ये भाताशिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण, आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या अनेकांना असं वाटतं की, रात्री भात खाल्ल्याने वजन वाढतं किंवा रक्तातील साखरेची पातळी बिघडते. यामुळे अनेकजण लठ्ठपणा टाळण्यासाठी भात खाणं बंद करतात. पण खरंच भातामुळे वजन वाढतं का? चला, तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया.भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, जे शरीराला ऊर्जा पुरवतं. याशिवाय, त्यात प्रोटिन्स, व्हिटॅमिन बी आणि काही खनिजंही असतात.
मात्र, पांढऱ्या तांदळात (रिफाइन्ड) फायबरचं प्रमाण कमी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणात पांढरा तांदूळ खात असाल आणि शारीरिक हालचाल कमी असेल, तर वजन वाढण्याची शक्यता असते.तज्ज्ञ सांगतात की, भात हा आपल्या शरीराचा शत्रू नाही; फक्त तो खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे. भातामुळे वजन वाढत नाही, पण चुकीच्या वेळी आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास, विशेषतः तेलकट पदार्थ, तूप किंवा तळलेल्या गोष्टींसोबत खाल्ल्यास कॅलरी वाढतात आणि वजन वाढण्याचा धोका असतो.आयुर्वेदानुसार, दुपार ही भात खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. कारण, दुपारी पचनशक्ती चांगली असते आणि भातातून मिळणारी ऊर्जा दिवसभरात वापरली जाते. रात्री भात खायचा असेल, तर कमी प्रमाणात आणि हलका खावा. रात्री पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे जास्त भात खाल्ल्यास तो पचायला जड जातो आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.थोडक्यात, भात खाणं वाईट नाही, पण त्याचं प्रमाण आणि वेळ यांचा विचार करणं गरजेचं आहे. संतुलित आहार आणि योग्य वेळेनुसार भात खाल्ल्यास तुम्ही निरोगी राहू शकता!




