‘रिकामं घरटं’ आणि हरवलेला संवाद; साठीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्यांमध्ये वाढतोय दुरावा
नातेसंबंधांच्या प्रवासात मुले हा केंद्रबिंदू असतात. त्यांच्या संगोपनात, शिक्षणात आणि करिअरच्या धावपळीत अनेक जोडपी स्वतःचे पती-पत्नी म्हणून असलेले नाते विसरून जातात. जोपर्यंत मुले घरात असतात, तोपर्यंत जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मतभेद दबले जातात. मात्र, मुले मोठी होऊन शिक्षण किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जातात, तेव्हा घर ‘एम्प्टी नेस्ट’ (रिकामं घरटं) होतं. याच शांततेत अनेक वर्षांपासून साचलेला भावनिक दुरावा आणि सुसंवादाचा अभाव प्रकर्षाने जाणवू लागतो. एकमेकांशी बोलण्यासाठी जेव्हा काहीच उरत नाही, तेव्हा अनेक ज्येष्ठ जोडपी वयाच्या साठीत घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत.
या ट्रेंडमागे प्रामुख्याने बदललेली जीवनशैली आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला दिलेले महत्त्व ही कारणे आहेत. मुलांची सर्व कर्तव्ये पूर्ण झाल्याची भावना निर्माण झाल्यावर, उरलेले आयुष्य स्वतःच्या अटींवर आणि आनंदाने जगण्याची इच्छा प्रबळ होते. पूर्वी ‘लोकापवादास्तव’ टिकवून धरलेली नाती आता केवळ ओझे वाटू लागतात. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि आर्थिक स्वावलंबन यामुळेही ज्येष्ठ नागरिक आता तडजोड करण्यापेक्षा शांतपणे वेगळे होणे पसंत करत आहेत. आयुष्याच्या या वळणावर जर जोडीदारासोबत पुन्हा नव्याने मैत्री झाली नाही, तर ‘एम्प्टी नेस्ट’ हा केवळ घराचा प्रकार न राहता नात्यातील पोकळी ठरत आहे.




