सोशल मीडियावर चर्चेत असतानाच समंथा रुथ प्रभूची इन्स्टा पोस्ट; ‘हक’ची कथा आणि यामीचा अभिनय शब्दांपलीकडे असल्याची भावना व्यक्त
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत दुसरं लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. याआधी नाग चैतन्यसोबतच्या तिच्या लग्नाचा आणि घटस्फोटाचा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता.
अशातच समंथाने घटस्फोटावर आधारित हिंदी चित्रपट ‘हक’बाबत लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इम्रान हाश्मी आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. प्रेक्षकांसोबतच अनेक सेलिब्रिटींकडूनही ‘हक’चं भरभरून कौतुक केलं जात आहे. याआधी आलिया भट्ट आणि करण जोहर यांनीदेखील या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिलं की, ‘हक’ची कथा अतिशय खोल, संवेदनशील आणि कोणताही पूर्वग्रह न बाळगणारी आहे. यामी गौतमने साकारलेली भूमिका हृदयाला थेट भिडणारी असून तिचा अभिनय शब्दांत मांडणं अशक्य आहे, असं तिने नमूद केलं.
ती पुढे म्हणते, “चित्रपट संपल्यानंतर लगेच मला ही पोस्ट लिहावी वाटली. कारण मनात उमटलेली भावना ताजी असतानाच व्यक्त करायची होती. अशा कथा फार कमी पाहायला मिळतात – अनेक थरांनी समृद्ध, प्रामाणिक आणि निर्णयांपासून मुक्त. आणि जेव्हा अशी कथा एका हुशार अभिनेत्रीमुळे जिवंत होते, तेव्हा तो अनुभव आणखी खास ठरतो. प्रेम, राग, ताकद, असुरक्षितता आणि आशा… या सगळ्या भावना मला एकाच वेळी जाणवल्या.”
समंथाने चित्रपटाच्या दिग्दर्शकासह संपूर्ण टीमचंही मनापासून कौतुक केलं. उत्तम लेखन आणि प्रभावी मांडणीमुळे ‘हक’ सिनेमाची खरी ताकद दाखवतो, असं तिने म्हटलं आहे.
दरम्यान, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही यामी गौतमच्या अभिनयाचं कौतुक करताना सांगितलं की, चित्रपट पाहून तो भावूक झाला आणि काही काळ नि:शब्द राहिला. ‘हक’ थिएटरमध्ये पाहता न आल्याची खंतही त्याने व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाने इतकं खोलवर प्रभावित केल्याची भावना त्याने शेअर केली आहे.




