धनंजय मुंडे यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार गुट्टेंची जोरदार प्रतिक्रीया; साखर कारखान्याचे कर्ज, शेअर्स व इंदोरमधील प्रकरणावरून राज्यभरात खळबळ
गंगाखेडच्या प्रचारसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोपाचा बाण सोडत राज्यभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंडे यांनी उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी गंगाखेडला येऊन गुट्टेंवर टीका केल्यानंतर हे सर्व घडामोडी घडल्या.
सभेत बोलताना गुट्टे म्हणाले की, “तुम्ही भांडणाची सुरुवात केली, पण शेवट मी करणार!” 2024 च्या निवडणुकीत मुंडेंनी त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले, विविध उमेदवार उभे केले, असा दावा करून त्यांनी सांगितले की गंगाखेडची जनता हेच त्यांचे ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ असल्यामुळेच ते विक्रमी मताधिक्याने निवडून आले.
याचदरम्यान गुट्टेंनी पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा केला “धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून होणार होता, पण दिवंगत भय्यूजी महाराजांनी त्यांची जीवावरची सुटका केली. ते कोणत्या हॉटेलमध्ये होते याची मला पूर्ण माहिती आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
तसेच साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणावर मुंडेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना गुट्टे म्हणाले की, गंगाखेड शुगर कारखान्याचे 106 कोटींचे कर्ज कारखान्याने परत केले असून शेतकऱ्यांच्या नावावर कोणतेही कर्ज उरलेले नाही. “शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज राहिले असेल तर मी तत्काळ राजकारणातून संन्यास घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंडेंच्या कारभारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जगमित्र साखर कारखान्यासाठी गोळा केलेले पैसे, देवस्थानची जमीन यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी मुंडेंना खुले आव्हान दिले. शेवटी त्यांनी प्रतिप्रश्न केला: “जर माझे दावे खोटे असतील, तर तुम्ही राजकारणातून बाहेर पडणार का? तुमचा आमदारकीचा राजीनामा देणार का?” आमदार गुट्टे यांच्या या स्फोटक भाषणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पाणी मंथन सुरू झाले असून या आरोपांवर मुंडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




