spot_img

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची ही कृती लाजिरवाणी काँग्रेस नेत्याची फडणवीसांवर टीका

spot_img

बिनविरोध निवड झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकामुळे काँग्रेस आक्रमक; उमेदवारांवर दबाव, धमक्या आणि गैरव्यवहाराचे आरोप

चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ बिनविरोध निवडून आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत तीव्र टीका केली आहे.

सपकाळ यांनी आरोप केला की, “मत चोरीच्या आधीच्या प्रकरणानंतर आता उमेदवारच उचलून नेण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली आहे.” त्यांच्या मते, जे लोक प्रत्यक्ष त्या भागात राहत नाहीत त्यांची नावे मतदार यादीत घालण्यापर्यंत सरकार पोहोचले आहे. “मुख्यमंत्र्यांची ही कृती लाजिरवाणी असून आम्ही त्याचा कठोर निषेध करतो,” असे ते म्हणाले.

काँग्रेसने पुढे असा आरोपही केला की, मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुसरे एक मामेभाऊ धर्मदाय आयुक्त आहेत आणि जमीन व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. चिखलदऱ्यातील जमिनी विकत घेण्यासाठीच नगरसेवक बिनविरोध करण्याचा खेळ रचला गेला, असा सपकाळ यांचा दावा आहे.

या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही मुख्यमंत्र्यांवर थेट टीका करत म्हटले की, “फडणवीस चिखलदऱ्यात सत्ता वापरून दमदाटी करत आहेत. उमेदवारांना धमकावून माघार घ्यायला भाग पाडलं जात आहे. हे सगळं मुख्यमंत्री पदाचा स्पष्ट दुरुपयोग आहे.”

त्यांनी आणखी पुढे जात म्हटले की, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून नोंदवले जातील. भाजपमध्ये मूळ कार्यकर्ते कमी आणि भाड्याने वापरले जाणारे लोक जास्त आहेत.”

काँग्रेसचा दावा आहे की आर्थिक लोभ, धमक्या, अपहरणाचे प्रयत्न आणि दडपशाही अशा अनेक मार्गांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आला. “कलोती यांचा पराभव झाला असता तर तो फडणवीसांसाठी मोठा धक्का ठरला असता, म्हणून संपूर्ण दडपशाहीचा डाव आखला गेला,” असा आरोपही करण्यात आला. चिखलदरा निवडणुकीतून उभ्या राहिलेल्या या आरोप-प्रतिआरोपांच्या मालिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अजूनच तापले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ