बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, अनेक वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधला आहे.
याच दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसने निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली. या भेटीत पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून या दिशेने समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड येथे माध्यमांशी बोलताना बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांवर भाष्य केले. त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक करत, त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती आणि त्यांनी ती मान्य केल्याचे सांगितले.




