महात्मा फुले जनआरोग्य योजने’त वाढ, तर बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी केंद्राशी चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्य मंत्रिमंडळानंतर पत्रकार परिषदेत तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. प्रथम, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कप (India women world cup) विजयाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. फडणवीस म्हणाले, “भारतीय महिला संघाने विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघातील महाराष्ट्राच्या तीन खेळाडू स्मृती मांधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांचा राज्य सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सरकारच्या धोरणानुसार त्यांना रोख पारितोषिक दिलं जाईल. पुढे ते म्हणाले, “संपूर्ण टीम मुंबईत आल्यावर त्यांचा सार्वजनिक सत्कारही केला जाईल.”
दुसऱ्या महत्त्वाच्या निर्णयात फडणवीस यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना अधिक व्यापक करण्याची घोषणा केली. योजनेत सध्या १,३०० आजारांचा समावेश होता, तो वाढवून आता २,४०० आजारांपर्यंत कव्हरेज देण्यात येणार आहे. “प्रत्येक नागरिकाला या योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचारमिळतील. काही गंभीर आजारांसाठी तर १० लाखांपर्यंतचा खर्च सरकार उचलणार आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अनेक आजारांच्या उपचारांचे पॅकेज रेटही वाढवले गेले आहेत , ज्यामुळे गोरगरीबांना अधिक चांगले उपचार मिळतील.
तिसऱ्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की, “पुणे आणि नगर जिल्ह्यात सुमारे १,३०० बिबटे विहरत आहेत. या विषयावर केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. आम्ही विनंती करणार आहोत की, बिबटे पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्याची आणि त्यांचं स्टरलायझेशन करण्याची परवानगी द्यावी.” फडणवीस म्हणाले, “जे बिबटे नरभक्षक ठरतात, त्यांच्यावर पुटडाऊन करण्याचीही परवानगी केंद्राकडून मागणार आहोत.”
एकूणच, राज्य सरकारने महिला क्रिकेटचा गौरव, जनआरोग्य सेवांचा विस्तार आणि वन्यजीव व्यवस्थापन या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज ठोस निर्णय घेतले असून, हे निर्णय राज्याच्या सामाजिक आणि पर्यावरणीय व्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.




