Crime News : प्रियकरासाठी आईनेच संपवला पोटचा गोळा; बाथरूममध्ये डोकं आपटून ६ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या

spot_img

हार्ट अटॅक’चा बनाव रचला, पण पोलिसांनी गुपित फोडलं; कुरुळीतील थरारक घटनेने महाराष्ट्र हादरला

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. आपल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका आईनेच आपल्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलाचा बळी घेतला आहे. आवेज मेहबुब शेख असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, कुरुळी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आई बसरीन शेख आणि तिचा प्रियकर राम कजेवाड यांनी मिळून या चिमुकल्याचा ज्या पद्धतीने अंत केला, ते ऐकून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी रात्रीच्या वेळी आवेजला बाथरूममध्ये नेले. तिथे अत्यंत अमानुषपणे पाण्याचा बादलीत त्याचे तोंड दाबून धरले आणि त्यानंतर भिंतीवर व जमिनीवर त्याचे डोके आपटून त्याची निर्घृण हत्या केली. हा भयानक गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी चित्रपटात शोभेल असा बनाव रचला. त्यांनी आवेजचा मृतदेह कारमधून थेट बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेला आणि तिथे मुलाचा मृत्यू ‘हृदयविकाराच्या झटक्याने’ झाला असल्याचा खोटा प्रचार केला. मात्र, आवेजच्या शरीरावरील जखमा पाहून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आई बसरीनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने आपल्या कृत्याची कबुली दिली. “पोटच्या गोळ्याची हत्या करताना या आईचे हात कसे कापले नाहीत?” असा प्रश्न आता समाजमनातून विचारला जात आहे. पोलिसांनी आरोपी आईला बेड्या ठोकल्या असून, तिचा फरार प्रियकर राम कजेवाड याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. प्रेमांध झालेल्या एका मातेने स्वतःच्याच रक्ताची आहुती घेतल्याने मानवी नातेसंबंधांच्या विदारक वास्तवावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ