शेजाऱ्यानेच रचला आत्महत्येचा बनाव, शवविच्छेदनातून खुनाचा पर्दाफाश
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. गोधनी रेल्वे परिसरात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण नागपूर हादरून गेलं आहे. अवघ्या २३ वर्षांच्या प्राची खापेकर या तरुणीचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने निर्दयपणे खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमागे एकतर्फी प्रेमाचा विकृत राग असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.
प्राची हेमराज खापेकर ही बी.ए.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ती शेअर ट्रेडिंगचं प्रशिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी तिचे वडील व भाऊ कामानिमित्त बाहेर होते, तर आईही घराबाहेर गेली होती. घर रिकामं असल्याचं पाहून शेजारी राहणारा ३८ वर्षीय शेखर अजाबराव ढोरे दुपारच्या सुमारास तिच्या घरात शिरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर गेल्या अनेक दिवसांपासून प्राचीचा पाठलाग करत होता. त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता, मात्र प्राचीने तो स्पष्टपणे फेटाळला होता. याच नकाराचा राग मनात धरून आरोपीने संधी साधली. घरात दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात शेखरने आधी प्राचीचा गळा आवळला, त्यानंतर तिचं डोकं भिंतीवर आणि जमिनीवर आपटलं. या हल्ल्यात प्राची गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
प्राचीचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी अत्यंत थंड डोक्याने आत्महत्येचा बनाव रचला. त्याने प्राचीचीच ओढणी वापरून मृतदेह पंख्याला लटकवला. सुरुवातीला कुटुंबीयांना ही आत्महत्या असल्याचाच संशय होता. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थितीची बारकाईने पाहणी केल्यानंतर संशय बळावला.
शवविच्छेदन अहवालात धक्कादायक सत्य समोर आलं. प्राचीचा मृत्यू फाशीमुळे नसून डोक्याला झालेल्या गंभीर मारामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. तिच्या शरीरावर झटापटीच्या खुणाही आढळल्या. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीनंतर पोलिसांनी शेखर ढोरेला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




