अवैध प्लेटिंग कंपन्यांच्या मनमानीचा फुटला घडा; एकाला अटक, तर पोलिसांच्या ‘क्रॉस केस’ कारवाईमुळे नागरिकांमध्ये संताप
मुंबईच्या मालाड उपनगरातील पालनगर भागात गुरुवारी एका किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले, ज्याचे रूपांतर थेट ॲसिड हल्ल्यात झाले. प्रभाग क्रमांक ४२ मध्ये असलेल्या अनधिकृत प्लेटिंग युनिट्समध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांमध्ये केवळ ६०० रुपयांच्या उधारीवरून बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटांनी एकमेकांवर कारखान्यात वापरले जाणारे जहाल ॲसिड फेकण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या संघर्षात केवळ मजूरच नाही, तर रस्त्यावरून चालणाऱ्या ६ ते ७ निष्पाप पादचाऱ्यांनाही ॲसिडचे चटके बसले असून ते गंभीररीत्या होरपळले आहेत.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत संदीप सरोज नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर सात जखमींवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुरार पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि समर बहादूर राजकुमार सिंह या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल करताना तिथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही आरोपी केल्याचा दावा स्थानिक करत असून, या विचित्र कायदेशीर कारवाईमुळे पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
पालनगर भागात तब्बल १०० ते १२५ बेकायदेशीर प्लेटिंग कंपन्या राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, या कंपन्यांना प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे अभय लाभले आहे. मानवी वस्तीत अशा प्रकारे धोकादायक रसायनांचा आणि ॲसिडचा वापर करणे कायद्याने गुन्हा असतानाही, येथे कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन केले जात नाही. कालच्या घटनेने या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला असून, आता या ‘डेथ ट्रॅप’ बनलेल्या कंपन्यांवर पालिका प्रशासन कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मजुरांच्या वैयक्तिक वादाचा फटका सर्वसामान्यांना बसल्याने मालाडमध्ये भीतीचे सावट आहे. पोलिसांनी सखोल तपासाचे आश्वासन दिले असले तरी, अवैध कंपन्यांच्या मालकांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्या पादचाऱ्यांचे काय चूक होती ज्यांना या वादात विनाकारण जखमा सोसाव्या लागल्या, हा सवाल आता विचारला जात आहे.




