नातेसंबंधांमध्ये कधी कोणत्या छोट्या कारणामुळे तणाव निर्माण होईल, हे सांगता येत नाही. अशाच एका धक्कादायक घटनेत, केवळ भाजीत केस आढळल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २५ वर्षीय विवाहित महिलेने आपले जीवन संपवले आहे.
ईश्वरी बनकर असे मृत महिलेचे नाव असून तिचा विवाह २८ जून २०२० रोजी अजय बनकर याच्यासोबत झाला होता. दोघे भावसिंगपुरा परिसरातील श्रावस्ती कॉलनीत राहत होते. विवाहानंतर काही काळातच त्याचा स्वभाव बदलत गेला. तो दररोज मद्यपान करून घरी येत असे आणि ईश्वरीवर शारीरिक तसेच मानसिक अत्याचार करत असे. यामध्ये सासरच्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.
ईश्वरीने तिच्यावर होत असलेल्या छळाबद्दल माहेरच्यांना माहिती दिली होती. त्यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. यापूर्वीही तीने या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, कुटुंबीयांच्या मध्यस्थीने वाद मिटवून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले होते.
६ एप्रिलच्या रात्री जेवणात केस आढळल्याने अजयने संतापून ईश्वरीला मारहाण केली. तिने ती वेदना रात्रभर सहन केली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे ७ एप्रिललाही पुन्हा मारहाण करत तिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. सततच्या अत्याचारांना कंटाळून अखेर ईश्वरीने मंगळवारी आत्महत्या केली.
या घटनेनंतर तिच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले.
या प्रकरणी पोलिसांनी पती अजय बनकरसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




