बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढताना दिसत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी निवडणुकीबाबत ठाम भूमिका घेत सांगितले की, उमेदवारी अर्ज भरण्यापासून कोणालाही रोखता येत नाही आणि परिस्थितीला तोंड देणं आवश्यक असतं. त्यांनी स्पष्ट केलं की, येणाऱ्या निवडणुकीत ते पूर्ण ताकदीने उतरतील आणि कोणाकडूनही पाठिंबा मागणार नाहीत. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत पक्षाचा ऱ्हास सुरू असल्याचे विधान केले.
पार्थ पवार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत काँग्रेसने वैयक्तिक पातळीवर टीका करत त्यांचा निषेध नोंदवला. दरम्यान, या वादात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, काँग्रेसला जर जनतेची भावना आणि परिस्थितीची जाणीव असेल, तर त्यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा. तसे झाल्यास सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सर्व घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणूक अधिकच चर्चेत आली असून, पुढील काही दिवसांत या राजकीय संघर्षाचा निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.




