समुद्रात बेकायदा तेल हस्तांतरणाचा खुलासा; तिन्ही जहाजे मुंबई बंदरात आणली, कर्मचारी ताब्यात
भारतीय तटरक्षक दलाने मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे 100 समुद्री मैल दूर तीन संशयास्पद जहाजांवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई समुद्रात तेलतस्करी रोखण्यासाठी करण्यात आली असून, यामुळे समुद्र सुरक्षा व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तटरक्षक दलाने सांगितले की, या जहाजांवर 5 फेब्रुवारीपासून लक्ष ठेवले होते. जहाजांवर संशयास्पद हालचालींवर सतत बारीक नजर ठेवण्यात आली होती. शनिवारी, 7 जानेवारी 2026 रोजी तटवर्ती दलाने जहाजांची तपासणी केली असता मोठा खुलासा झाला. या तीन जहाजांचे मालक परदेशात स्थायिक असल्याचे लक्षात आले आणि समुद्रात तेल आणि इतर तेलजन्य पदार्थ बेकायदा हस्तांतरण केल्याचे सिद्ध झाले.
तटरक्षक दलाने जहाजांची तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर ही तिन्ही जहाजे मुंबई बंदरात आणली गेली असून, जहाजांवरील सर्व कर्मचारी भारताच्या ताब्यात आहेत. घटना गंभीर असल्याने पुढील कारवाई आणि चौकशी सुरू आहे.
भारतीय तटरक्षक दलाने म्हटले की, समुद्रातील सुरक्षा तपासणीचे काम सतत सुरु असून, प्रत्येक जहाजावरील हालचालींचे बारकाईने निरीक्षण केले जाते. मुंबईच्या किनाऱ्याजवळील ही कारवाई समुद्रात बेकायदा तस्करी थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.




