इंधन दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे भारतासह संपूर्ण जग धास्तावले
सध्या संपूर्ण जग एका भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षाचा थेट फटका भारताच्या ऊर्जेला बसला असून, देशात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईसह गॅसचे दरही गगनाला भिडले आहेत. एकीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर एकमेकांवर हल्ले करत असतानाच, दुसरीकडे आशिया खंडात नवा भूकंप आला आहे. जपानमधील चीनच्या दूतावासावर एका सशस्त्र व्यक्तीने घुसखोरी करून हल्ला केल्याने बीजिंग आणि टोकियोमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
तैवानच्या मुद्द्यावरून आधीच वितुष्ट असलेल्या या दोन देशांमधील संबंध आता टोकाला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती जपानच्या ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्सशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जर हे सत्य ठरले, तर जपानला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या पेचाला सामोरे जावे लागू शकते. चीनने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. एका बाजूला युद्धाचे ढग आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक संकट, अशा दुहेरी कत्रीत सध्या जग सापडले आहे.




