spot_img

CM Fadnavis : लाडक्या बहिणींचा ‘लाडका भाऊ’ कोण? फडणवीसांनी दिलं एका वाक्यात उत्तर

spot_img

तेजश्री प्रधान यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार

राज्य सरकारची सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा राजकीय फायदा महायुतीला मिळाल्याचं मानलं जातं. सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारातही ही योजना केंद्रस्थानी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने या योजनेवर भूमिका मांडताना दिसत आहेत.

अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देणारी ही योजना बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत होते. मात्र सत्ताधारी नेत्यांनी हे दावे फेटाळून लावत योजना अखंडपणे सुरूच राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, ठाण्यात ‘ठाणे वैभव’ वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत तेजश्री प्रधान यांनी थेट प्रश्न विचारला की, ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ नेमका कोण? तुम्ही, एकनाथ शिंदे की अजित पवार?’

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही तिघेही लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहोत. तिघांनाही त्यांचं प्रेम मिळालं आहे आणि त्यांनी आम्हाला भरभरून साथ दिली, म्हणूनच आज आम्ही सत्तेत आहोत.”

याच मुलाखतीदरम्यान राजकारणातील ‘ब्रँड’ या संकल्पनेवरही फडणवीसांनी स्पष्ट मत मांडलं. महाराष्ट्रात खरा एकमेव ब्रँड बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्यानंतर कोणीही ब्रँड नाही, असं सांगत त्यांनी महायुतीची ताकद अधोरेखित केली. “मी आणि एकनाथ शिंदे यांची युती इतकी भक्कम आहे की, कोणी ब्रँड असल्याचा दावा करत आमच्यासमोर उभं राहिलं, तर त्यांचा ‘बॅण्ड’ वाजवायला वेळ लागणार नाही,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ