छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला चक्क सामूहिक कॉपी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतानाही शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांना उत्तरांचे कागद पुरवत होते. याप्रकरणी १९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई केली जाईल.
जैतापूरच्या परीक्षा केंद्रावर १४ वर्गांमध्ये ३२७ विद्यार्थी परीक्षा देत होते. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर आणि विस्तार अधिकारी सीताराम पवार यांचे पथक अचानक केंद्रावर पोहोचले. तपासणी दरम्यान पथकाला असे ९ कागद सापडले, ज्यावर हुबेहूब एकसारखी उत्तरे लिहिली होती. हा केवळ योगायोग नसल्याचा संशय आल्याने लाठकर यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आणि समोर आलेलं चित्र पाहून अधिकारीही चक्रावून गेले.
या गैरप्रकारानंतर शिक्षण विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या असून, सखोल चौकशीनंतर दोषी विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जाईल. तसेच, या सामूहिक कॉपीला खतपाणी घालणाऱ्या केंद्र संचालकांसह १९ कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.




