थापटी तांड्यात तणावपूर्ण परिस्थिती; तोडफोडीत लाखोंचे नुकसान, काही जखमी.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथे शनिवारी उशिरा रात्री मोठा गोंधळ निर्माण झाला. कुलस्वामिनी कला केंद्राबाहेर काही मद्यधुंद तरुणांनी रस्त्याने जात असलेल्या रजापूर येथील एका युवकाला किरकोळ कारणावरून अडवून मारहाण केल्याची घटना घडली.
या मारहाणीच्या दरम्यान आरोपींपैकी एका तरुणाने खिशातून पिस्तूल काढून हवेत गोळी झाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती रजापूर गावात पोहोचताच सुमारे 300 गावकरी संतप्त अवस्थेत कला केंद्राकडे निघाले.
रागावलेल्या जमावाने केंद्राचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. केंद्रातील फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल, तसेच इतर विद्युत उपकरणे फोडण्यात आली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 वाहनांचीही नासधूस करण्यात आली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दगडफेक आणि गोंधळात तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी केंद्रात डान्स कार्यक्रम सुरू होता आणि मोठी गर्दी उपस्थित होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.




