आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घरगुती गॅस आणि इंधन तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत आहेत. मात्र राज्यात एलपीजी किंवा इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्य सरकारच्या वतीने नागरिकांना दिलासा देत त्यांनी गॅस आणि इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.
भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात घरगुती एलपीजीची दररोजची मागणी सुमारे ९ हजार मेट्रिक टन इतकी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत उत्पादन वाढवून ते ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. मार्च महिन्यात मागील सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पेट्रोल आणि डिझेलचा साठाही पुरेसा असून रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले.
गॅस वितरण व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली या समित्या काम करणार आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा तसेच इतर अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतीही तांत्रिक अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष तसेच व्हॉट्सअॅप सुविधा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, सरकारकडून पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी काही भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बुकिंग करूनही गॅस मिळण्यात उशीर होत असल्याने नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याचे चित्र अनेक शहरांत दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत राज्यात एलपीजीचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.




