अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना महत्त्वाचा सल्ला देत सांगितले की, ज्या भागात पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) सुविधा उपलब्ध आहे, तेथे लवकरात लवकर कनेक्शन घ्यावे. कारण भविष्यात अशा भागांमध्ये एलपीजी गॅस पुरवठा बंद करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकार सध्या पीएनजीच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असून त्याचा प्रसार वाढवण्यावर भर दिला जात आहे. भुजबळ यांच्या मते, या संदर्भात केंद्रस्तरीय बैठक पार पडली असून त्यात मनोहरलाल खट्टर, हरदीप सिंह पुरी आणि प्रल्हाद जोशी यांसारखे वरिष्ठ मंत्री तसेच विविध राज्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पीएनजीचा वापर वाढवण्यावर चर्चा झाली. यापूर्वीच काही ठिकाणी तीन महिन्यांनंतर एलपीजी बंद करण्यासंदर्भात पत्रव्यवहार झाल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करून पर्याय स्वीकारावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.




