spot_img

Chandrpur Mahanagarpalika : चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेची कोंडी?

spot_img

भाजपला राज्यभर यश, पण चंद्रपूरमध्ये बहुमतापासून दूर; महापौर पदावरून राजकीय खेळी वाढल्या

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या निवडणुकांमध्ये भाजपने राज्यभरात जोरदार कामगिरी केली आहे. तब्बल २५ महानगरपालिका भाजपने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मात्र या यशाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेत चित्र वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेसने चांगली कामगिरी केली असली, तरी काँग्रेस किंवा भाजप या दोघांनाही स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतके संख्याबळ मिळालेले नाही.

चंद्रपूर महानगरपालिकेत सध्याची स्थिती पाहता काँग्रेसकडे २७, तर भाजपकडे २४ नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही प्रमुख पक्षांना इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आवश्यक ठरणार आहे. या पालिकेत शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्याचबरोबर २ अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे २, बहुजन समाज पार्टीचा १ आणि एमआयएमचा १ नगरसेवक आहे. त्यामुळे सत्तेची किल्ली आता लहान पक्षांच्या हातात गेल्याचे चित्र आहे.

दरम्यान, भाजपकडून महापालिकेत सत्ता स्थापनेचा दावा केला जात असून संख्याबळ जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मात्र महापौर पदावरून भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद दिले जाणार नाही, वेळ पडल्यास भाजप विरोधी पक्षात बसण्यास तयार आहे, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, अनेक नगरसेवकांनी भाजपचा महापौर असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत दोन वेळा चर्चा झाली असली तरी पहिल्याच बैठकीत महापौर पद देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजपचाच महापौर आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

या निवडणुकीत चंद्रपूर शहराने भाजपला मोठा धक्का दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. विद्यमान भाजपच्या महापौर राखी कांचलवार यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव झाला. तसेच भाजपमधील अंतर्गत मतभेद, विशेषतः मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही भागांमध्ये काँग्रेसने १३, भाजपने ११, तर ठाकरे गटाने ५ जागा जिंकल्या आहेत.

२०१७ च्या निवडणुकीत भाजपने चंद्रपूरमध्ये ३६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरचे प्रतिनिधी असल्याने काँग्रेसला येथे अतिरिक्त बळ मिळाल्याचे मानले जाते. याआधी नगरपरिषद निवडणुकीतही भाजपला चंद्रपूरमध्ये फटका बसला होता.

एकूणच, राज्यात भाजपचे वर्चस्व दिसत असले तरी चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणे तयार होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत कोण कोणासोबत जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ