वरळीतील शिवसेना (ठाकरे गट) मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष प्रहार; प्रत्युत्तरात बावनकुळे म्हणाले “घरात बसलेला अजगर स्वतःच्या पक्षालाच गिळून गेला”
मुंबईतील वरळी डोममध्ये झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) च्या निर्धार मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी अमित शाह (Amit Shah) यांचा अप्रत्यक्षपणे ‘ॲनाकोंडा’ असा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याने भाजप नेते आक्रमक झाले असून, आता राज्यात “ॲनाकोंडा विरुद्ध अजगर” अशी नवी राजकीय जुंपण रंगली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं “उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत. ज्यांनी स्वतःच्या पक्षालाच गिळलं, शिवसैनिकांना गिळलं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचाही नाश केला.”
बावनकुळे यांनी पुढे आरोप केला की उद्धव ठाकरे हे सत्तेपासून दूर गेल्यापासून वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि पराभवानंतर मानसिक संतुलन हरवले आहे. “ते फक्त घरात बसून मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करतात, पण स्वतः काहीच काम करत नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी पुढे सांगितलं की, “अमित शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, कलम ३७० रद्द करून इतिहास घडवतात, आणि उद्धव ठाकरे मात्र फक्त फूत्कार काढतात. २५ वर्षे मुंबई गिळंकृत करणारा हा अजगर आज इतरांवर दोष देतो.”
बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या भाषणशैलीवर टीका करत म्हटलं की, उद्धव ठाकरे आता विवेकभ्रष्ट आणि नीच स्तरावरची राजकारणं करत आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला पराभव निश्चित असल्याने, ते अशा वक्तव्यांद्वारे कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेवटी बावनकुळे यांनी चढ्या सुरात इशारा दिला “तुमच्या या विकृत राजकारणाला तुमचे स्वतःचे कार्यकर्तेही कंटाळले आहेत. एक दिवस असा येईल, जेव्हा मागे वळून पाहिलं तर तुमच्यासोबत कुणीच राहणार नाही.” दरम्यान, या ‘अजगर ॲनाकोंडा’ वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं तापमान पुन्हा वाढलं असून, ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.




